शिवसेनेला मदत करणाऱ्या त्या २७ नगरसेवकांन विरोधात ३० हजार पानाची याचिका

जळगाव: जळगाव महापालिकेत महापौर, उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेला मदत करणाऱ्या भाजपच्या बंडखोर नगरसेवकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या २७ नगरसेवकांनी विरोधात मतदान करत शिवसेनाला मदत केली होती. यामुळे भाजपचे महापौर पदाचे उमेदवार प्रतिभा कापसे, उपमहापौर पदाचे उमेदवार सुरेश सोनवणे यांचा पराभव झाला होता. तर महापौरपदी जयश्री महाजन, उपमहापौरपदी कुलभूषण पाटील विजयी झाले होते. भाजपच्या २७ नगरसेवकांनी पक्षादेश न जुमानता विरोधात मतदान केले होते.
या २७ नगरसेवकांवर पक्ष आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नाशिकच्या विभागीय आयुक्ताकडे ३० हजार पानांची याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती भाजप गटनेते भरत बालानी यांनी माहिती दिली. भाजपने या २७ नगरसेवकांना प्रत्यक्ष, मोबाईल, whatsapp, वृत्तपत्र असा माध्यमातून पक्षादेश बजावला होता. मात्र, त्याचा भंग केल्याचा भाजपचा आरोप आहे. व्हीप बजावला असल्याचा पुरावा म्हणून ३० हजार पाने असलेली याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच, महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीदरम्यान ऑनलाईन सभेत नगरसेवक, मनपा अधिकाऱ्या व्यतिरिक्त इतर जण सहभागी झाल्यामुळे ही महासभा बेकायदेशीर असल्याबाबत भाजपच्या वतीने न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात येणार आहे.