वाझे यांच्याकडील सरकारी कोट्यातून दिलेले २५ काडतुसे गायब
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेली वाहने ठेवल्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाझे यांच्या घरात ६२ जिवंत काडतुसे सापडली आहे. ही काडतुसे घरात का ठेवली याचे उत्तर वाझेंकडे नसल्याचे एनआयएने विशेष न्यायालयात सांगितले. त्यामुळे वाझे यांच्याकडे ही काडतुसे आली कुठून? आणि त्यांनी ही काडतुसे का ठेवली? याबाबत गूढ वाढले आहे.
गुरुवारी सचिन वाझे यांची कोठडी संपत असल्याने त्यांना एनआयएच्या विशेष न्यायालयात आणण्यात आले होते. सचिन वाझे यांना पोलीस अधिकारी म्हणून सरकारी कोट्यातून ३० जिवंत काडतुसे देण्यात आली होती. ३० पैकी ५ काडतूस त्यांच्या कडे आहे तर २५ काडतूस गायब आहेत. ही २५ काडतुसे कुठ आहेत याची सुद्धा माहिती नसल्याचे वाझे यांनी सांगितल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास सुद्धा एनआयए कडे देण्यात आला आहे. याबाबत न्यायालयात एनआयए काय सांगते या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.