केंद्राकडे पडून असलेला खासदारांचा १९६ कोटींचा निधी द्या : खासदार डॉ. अमोल कोल्हे

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्राकडे पडून असलेला खासदार निधी देण्याची मागणी केली आहे. खासदारांना मतदारसंघासाठीचा निधी दिला, तर संपूर्ण राज्यभरात या माध्यमातून मोठी आरोग्य सुविधा उभी करता येईल, असा मुद्दा त्यांनी या पत्रातून मांडला आहे. तसेच याविषयी त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडं खासदार निधी देण्याची मागणी केली आहे.
खासदारांना केंद्राकडून ५ कोटींचा निधी मिळतो. मात्र, यापूर्वी न मिळालेला जवळपास १९६ कोटींचा खासदार निधी पडून आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पाहिली तर प्रत्येक मतदार संघात आरोग्य सुविधा उभारणे गरजेचे आहे. राज्यात ४८ खासदार आहेत. जर त्यांना त्यांच्या मतदारसंघासाठीचा निधी दिला, तर संपूर्ण राज्यभरात या माध्यमातून मोठी आरोग्य सुविधा उभी करता येईल. गरज असेल त्यानुसार जम्बो कोविड सेंटर, ऑक्सिजन प्लांट यासाठी हा निधी लोकप्रतिनिधी वारता येईल, त्याद्वारे आरोग्य व्यवस्था बळकट होण्यास मदत होईल, असे मत खासदार कोल्हे यांनी या पत्रातून मांडले आहे.
आजच्या घडीला संसद भवन किंवा इतर गोष्टींपेक्षा माणसं वाचवणं गरजेचं आहे. त्यामुळं हा निधी देण्याची मागणी कोल्हेंनी केली. कोल्हेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर यापूर्वी देखिल संसदभवन किंवा इतर गोष्टींपेक्षा आरोग्य व्सवस्था बळकट करण्याची मागणी केलेला व्हिडिओ देखिल शेअर केला आहे.
कोरोनाच्या या संकटातही केंद्र सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. खासदार कोल्हेंनी निधीची मागणी केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.