देहूच्या गाथा मंदिरात १८ जणांना कोरोनाची लागण
पुणे: देहूमधील गाथा मंदिरातील १८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या सर्व जणांची प्रकृती स्थिर असून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
गाथा मंदिराच्या आस्थापनातील हे कर्मचारी आहे. यातील काही जणांना त्रास होत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. त्यातील १८ जणांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहे.
एवढा मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित सापडल्याने गाथा मंदिर बंद ठेवण्यात आले. बाधीतांमध्ये कर्मचारी, पहारेकरी आदींचा समावेश आहे. यामुळे २९ मार्च रोजी असणाऱ्या तुकाराम बीज वर निर्बंध येणार असल्याची शक्यता आहे.
देहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी सांगितले की, गाथा मंदिरातील ३ जणांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यामुळे सर्व ७२ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील १८ जणांना कोरोना झाल्याचे आढळून आले. सर्वांची प्रकृती चांगली आहे. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून उपचार सुरु आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांवर सुद्धा लक्ष ठेवण्यात येत आहे.