ड्रीम्स मॉल दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून दिलगिरी व्यक्त
५ लाखांची मदत जाहीर
मुंबई: भांडूपमध्ये ड्रीम्स मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग लागली आणि वरच्या मजल्यावरील सनराइज रुग्णालयापर्यंत या आगीचा धूर पोहोचला गुरुवारी रात्री आग लागली होती, याठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा सकाळी ८ च्या सुमारास आग भडकल्याची माहिती समोर आली होती.
आग लागली तेव्हा सनराइज रुग्णालयात ७६ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील ४६ लोकांना आतापर्यंत इतर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मुलुंड येथील जम्बो कोविड रुग्णालयात ३०, भांडुपच्या फोर्टिस रुग्णालयात ४, ठाण्यातील विराज रुग्णालयात २, अग्रवाल रुग्णालयात ५ तर बीकेसी कोविड सेंटर, गोदरेज रुग्णालय (घाटकोपर), सारथी हॉस्पिटल (टँक रोड) मध्ये प्रत्येकी एका रुग्णाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, दोघांना घरी सोडण्यात आलं आहे.
गुरुवारी रात्री लागलेल्या आगीमुळे मुंबईतील भांडूप परिसर पुरता हादरून गेला आहे. याठिकाणाहून मिळालेल्या लेटेस्ट अपडेटनुसार याठिकाणी १० जणांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने ६ जणांच्या मृत्यूबाबत माहिती दिल्यानंतर आणखी ४ जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढेल का अशी भीती निर्माण झाली आहे. कारण या मॉलमध्ये साधारण ५०० ते ६०० दुकानं सुरू होती. मुंबई महापालिकेने ६ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला होता. अग्निशमन दलाला याठिकाणी मृतदेह सापडले आहेत.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मध्यरात्रीच घटनास्थळाला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला होता. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही केल्या होत्या. मॉलमध्ये रुग्णालय असल्याबद्दल त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले असून या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान मृतांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्रांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करून हलगर्जीपणा झाल्याचं आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणालेत.
काय आहे हॉस्पिटलचे स्टेटमेंट?
‘भांडूपमध्ये ड्रीम्स मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग लागली आणि वरच्या मजल्यावरील सनराइज रुग्णालयापर्यंत या आगीचा धूर पोहोचला.सर्व फायर अलार्म वाजल्यानंतर धुरातून सर्व रूग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याठिकाहून २ मृतदेह (कोव्हिडमुळे मृत्यू झालेले) बाहेर काढण्यात आले. आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व रुग्णांना तातडीने जंबो कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले (आणि काही इतर खासगी रुग्णालयात) आहे. लोकांचे प्राण वाचविण्यास मदत केल्याबद्दल मुंबईकर अग्निशमन दलाचे आणि मुंबई पोलिसांचे आभारी आहोत.’