कोरोनाच्या लढाईत भारताला पॅट कमिन्स नंतर ऑस्ट्रेलियाच्या अजून एका खेळाडूची मदत

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने सोमवारी ५० हजार डॉलरची मदत भारतातील करोनाच्या लढ्यासाठी केली होती. आता ऑस्ट्रेलियाचा दुसरा खेळाडू ब्रेट ली हा भारतातील कोरोनाच्या लढाईसाठी पुढे आला आहे. ब्रेटने आपणही भारतातील कोरोना लढ्यासाठी मदत करणार असल्याचे आज जाहीर केले आहे.
ब्रेट यावेळी म्हणाला की, ” भारत हा देश माझ्यासाठी दुसरं घर आहे. कारण भारताकडून मला बरंच प्रेम मिळालं आहे. त्याचबरोबर बऱ्याच व्यक्तींनी आतापर्यंत मला मदत केली आहे. सध्याच्या घडीला भारतातील परिस्थिती ही फार कठीण आहे. त्यामुळे त्यांना यावेळी मदत करणं हे मी माझे कर्तव्य समजतो. त्यामुळे भारतातील लोकांना ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये, यासाठी मी हे काम करण्याचे ठरवले आहे.”
ब्रेट पुढे म्हणाला की, ” भारतामधील हॉस्पिटल्समध्ये सध्याच्या घडीला ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे या गोष्टीसाठी मदत करावी, असे मला वाटते. त्यामुळे मी भारतातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची सोय होण्यासाठी (1 BTC ) बिटकॉइन दान करत आहे. मला आशा आहे की, भारतातील परिस्थिती सुधारेल. त्याचबरोबर ज्या व्यक्ती यावेळी जीवाची पर्वा न करता चांगले काम करत आहे, त्यांनाही शुभेच्छा. कारण त्यांचे कामही या परिस्थितीत महत्वाचे आहे.”
पॅट कमिन्सनेही केली मदत…
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सोशल मीडियावर एक पत्र जाहीर केले,यामध्ये कमिन्सने सांगितले की, ” सध्याच्या घडीला भारतामध्ये फार कठीण काळ सुरु आहे. भारतामध्ये सध्याच्या घडीला ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन टँक विकत घेण्यासाठी मी ५० हजार डॉलरएवढी रक्कम देत आहे.” कमिन्स हा सध्याच्या घडीला आयपीएल खेळत असून तो कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात आहे.