ऑक्सिजनच्या वापराबाबत राज्यभर ‘नंदूरबार पॅटर्न’ राबविण्यात येणार

मुंबई : देशभर कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन कमी पडत आहे. यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऑक्सिजनच्या वापराबाबत एक एसओपी तयार केली आहे. राज्यातील सर्व रुग्णालयांना याबाबत सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात ऑक्सिजनच्या वापराबाबत प्रमाणीत कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात आली असून त्यानुसार रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर रुग्णालयांनी नंदूरबार पॅटर्ननुसार ऑक्सिजन नर्सची नेमणूक करणेबाबत सूचना दिल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात सध्या १ हजार६१५ मेट्रीक टन ऑक्सिजन वापरला जातो. त्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी प्रमाणीत कार्यपद्धती तयार करण्यात आली असून ती सर्व रुग्णालयांना पाठविण्यात आली आहे. नंदूरबार जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन नर्स ही संकल्पना राबविण्यात आली असून ५० रुग्णांसाठी एक नर्स नेमून तिच्या माध्यमातून ऑक्सिजन वापरावर लक्ष ठेवले जाते. ही संकल्पना यशस्वी झाल्याचे दिसत असून अशा प्रकारचा प्रयोग अन्य रुग्णालयांनी राबवणेबाबत सूचना दिल्या आहेत. राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आतापर्यंत १०० पीएसए प्लांटसाठी कार्यादेश देण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात दीड कोटी नागरिकांचे लसीकर
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन. दररोज ८ लाख लसीकरणाचे राज्याने उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा,अशी मागणी केंद्र शासनाकडे केली आहे.
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे १२ कोटी डोसेसची आवश्यकता आहे.